ACHARYA ABHISHEK

सर्गेई आयझेन्स्टिन

खऱ्या अर्थाने रशियन सिनेमाची ख्याती जगभर पोहोचविणारा दिग्दर्शक म्हणन सर्गेई आयझेन्स्टिनचे नाव घ्यावे लागेल.

रशियन सिनेसृष्टीला कुलशेव्ह व वर्ताव्ह हे दोन कल्पक दिग्दर्शक लाभले. पण खऱ्या अर्थाने रशियन सिनेमाची ख्याती जगभर पोहोचविणारा दिग्दर्शक म्हणन सर्गेई आयझेन्स्टिनचे नाव घ्यावे लागेल.

इ.स. १८९० नंतर जगभर चित्रपटनिर्मितीच्या प्रयोगांना चालना मिळाली. सोव्हिएत रशियात चित्रपटनिर्मितीला १८९८पासनच तुरळक प्रमाणात सुरुवात झाली तरी या प्रक्रियेला खरा वेग सुमारे १० वर्षांनी आला. या काळात रशिया हा एका अभतपूर्व क्रांतीच्या उंबरठ्यावर उभा होता. रशियन क्रांती व पहिल्या महायुद्धामुळे लोकजीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रचंड उलथापालथ झाली होती. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या साऱ्या धामधुमीतदेखील चित्रपटकलेने लेनिनसारख्या मुत्सद्दी राजकारण्यावर व तत्त्ववेत्त्यावरही प्रभाव टाकला होता. ‘सिनेमा’ हे अत्यंत महत्त्वाचे कलामाध्यम आहे, असे त्याचे मत होते. त्यामुळे क्रांतीनंतर त्याने चित्रपट व्यवसायाला खपच मदत केली. या सुमारासच रशियन सिनेसृष्टीला कुलशेव्ह व वर्ताव्ह हे दोन कल्पक दिग्दर्शक लाभले. पण खऱ्या अर्थाने रशियन सिनेमाची ख्याती जगभर पोहोचविणारा दिग्दर्शक म्हणन सर्गेई आयझेन्स्टिनचे नाव घ्यावे लागेल.

सर्गेई आयझेन्स्टिनचा जन्म २३ जानेवारी १८९८ रोजी झाला. रशियन क्रांतिपर्वात तो लाल फौजांमध्ये काही काळ इंजिनीयर म्हणून काम करीत होता. १९२० साली तो मॉस्कोला आला. तेथे त्याने प्रायोगिक रंगभूमीवर नेपथ्यकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली. त्याच्या डोक्यात नेहमीच रूढ चाकोरीपेक्षा काही वेगळे घोळत असे. एकदा त्याने नाटकातील मुष्टियुद्धाचा प्रसंग प्रेक्षकांत रिंगण करून सादर करावा, अशी कल्पना मांडली. पण दिग्दर्शकाने ती फेटाळन लावली. पुढे त्याने ‘गॅस मास्क’ नावाचे नाटक थेट मास्क फॅक्टरीतच सादर केले. पण एवढी ‘वास्तवता’ प्रेक्षकांच्या पचनी पडली नाही. तो प्रयोग सपशेल पडला.

मॉस्कोतील कुलशेव्हच्या चित्रपट प्रशिक्षण शाळेत त्याने या कलेचे पहिले धडे घेतले. पण येथेही पूर्वसुरी पेक्षा वेगळ्या दिशेने त्याचे विचार चालत. शिवाय प्रत्येक संकल्पनेमागे पद्धतशीर अभ्यास व शास्त्रीय बैठक असावी असे त्याचे मत होते. चित्रपट हे माध्यम नाटकापेक्षा स्वतंत्र पद्धतीने कसे विकसित करता येईल याचा त्याने विचार केला व ‘मोंताज’ नावाचे प्रभावी तंत्र विकसित केले.

१९२४ साली ‘स्ट्राइक’ या चित्रपटाद्वारे त्याला दिग्दर्शनाची प्रथम संधी मिळाली. या चित्रपटात ‘इंटरकटिंग’ हे तंत्र त्याने प्रभावीपणे वापरले. एका प्रसंगी पोलिसांच्या खबऱ्याचे दृश्य दाखविल्यानंतर त्याने लगेच एका घुबडाचा क्लोजअप दाखविला. त्याचप्रमाणे सैनिक निरपराध नागरिकांची कत्तल करीत आहेत, असे दाखविताना मध्येच कत्तलखान्यातील प्राण्यांची कत्तल दाखविली. चित्रपटाच्या भाषेचा असा प्रतिकात्मक उपयोग करण्यास त्यानेच प्रथम प्रारंभ केला.

१९२५ साली आयझेन्स्टिनने आपला दुसरा चित्रपट ‘बॅटलशिप पोटेमकिन’ सादर केला. हा जागतिक चित्रपटसृष्टीतील

सर्वकालीक श्रेष्ठ चित्रपटांपैकी एक मानला जातो. या सिनेमात त्याने क्रांतिपर्वातीलच एक कथा सांगितली आहे. १९०५ साली झारच्या जुलमी सत्तेविरुद्ध नाविकांनी केलेल्या बंडाचे चित्रण त्याने येथे केले होते. ‘पोटेमकिन’ या लढाऊ बोटीवरील खलाशांना खाण्यासाठी सडलेले मांस दिले जाते. ते हे अन्न खाण्यास नकार देतात, पण उलट त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाते. अशा वेळी वकुलिंचुक नावाचा खलाशी कामगारांना एकत्र करून निर्भय बनण्याचे आवाहन करतो.

या चित्रपटात अनेक अविस्मरणीय दृश्यांच्या मालिका पाहावयास मिळतात. आयझेन्स्टिनला केवळ एक घटना सांगावयाची नव्हती. त्याला जाणवलेले तिच्यातील नाट्य त्याला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवायचे होते. या ७० मिनिटांच्या चित्रपटात अनेक चित्तथरारक प्रसंग निर्माण करून, त्याभोवती मानवी भावनांचे जाळे विणत त्याने एक भावकाव्य निर्माण केले. एका प्रसंगात कॅप्टन काही खलाशांच्या अंगावर ताडपत्री टाकून त्यांना सैनिकांच्या तुकडीपुढे उभे करतो व सैनिकांना त्यांच्यावर गोळ्या झाडण्याची आज्ञा देतो. त्याच वेळी वकुलिंचुक नाट्यपूर्ण आवाहन करतो, “बंधुंनो, तुम्ही कोणावर गोळ्या झाडीत आहात? आम्ही तुमचे भाऊच आहोत.” सैनिक गोळ्या झाडण्याचे नाकारतात. खलाशी बंड करतात. त्यांचा विजय होतो, पण या लढयात वकुलिंचुक मात्र मारला जातो.

बोट ओडेसी बंदरात येते. वकुलिंचुकचे प्रेत धक्क्यावर ठेवले जाते. ही बातमी शहरात पसरताच हजारोंच्या संख्येने लोक बंदराकडे धाव घेतात. खलाशांचे उत्स्फूर्त स्वागत करतात. मात्र शासकांना हे खपत नाही. सैनिकांची तुकडी अकस्मात या निरपराध नागरिकांवर गोळीबार करू लागते. अनेकजण बंदुकीच्या गोळ्यांना बळी पडतात. उत्तर म्हणून बोटीवरल्या तोफा शहरातल्या महालांवर आग ओकतात.

बोट बंदरातून जाताना पुन्हा झारच्या सैनिकांकडून वेढली जाते. बोटीवरून पुन्हा पूर्वीसारखे भावनात्मक आवाहन केले जाते. सैनिक बोटीवर गोळीबार करण्याचे नाकारतात. बोट सुखरूप पुढे निघून जाते. या चित्रपटातील निरपराध नागरिकांवर सैनिकांनी केलेल्या बेछूट गोळीबाराचे चित्रण जागतिक चित्रपट इतिहासातील एक अविस्मरणीय दृश्य म्हणून नावाजले गेले आहे. मी फिल्म इन्स्टिट्यूटचा ऑप्रिसिएशन कोर्स करीत असताना आम्हाला सिनेमातील फक्त सहा मिनिटांचा हा प्रसंग दाखविला होता. हा प्रसंग पाहणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता. पुढे मी संपूर्ण चित्रपट पाहिला.